Blog Details

If You Really Want To Know,Look In The Blog

img

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या 5 अनोख्या गोष्टी

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥१॥
महालक्ष्मी जी महामाया आहे, जिची पूजा स्वतः देव तिच्या निवासी करतात त्या देवीला नमस्कार. महालक्ष्मी जिच्या हातात शंख, चक्र, गदा आहे अश्या देवीला नमस्कार…..
देवीच्या आराधनेसाठी निर्मित आठ वेगवेगळ्या श्लोकांच्या देवीच्या महालक्ष्मी अष्टकम मधील ही सुरुवात. दोस्तहो.. आज एका जगप्रसिध्द महालक्ष्मी मंदिराबद्दल मी बोलणार आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार कोलासुर नावाच्या भयंकर राक्षसाने ज्या नगराची म्हणजे कोल्हापूरची स्थापना केली त्या ठिकाणी असलेल्या प्राचीन मंदिराच्या 5 अनोख्या गोष्टी आज सांगणार आहे. असे मानतात की जेव्हा देवी महालक्ष्मीने कोलासुराला ठार मारले तेव्हा त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याचे नाव या नगरीला देण्यात आले. अन याच नगरीत देवीचे मंदीर उभे केले गेले….

1. सहा शक्तीपिठापैकी एक :

महालक्ष्मी मंदिर सहा शक्तीपिठापैकी एक. श्री विष्णू व श्री लक्ष्मी करवीर क्षेत्री वास करतात अन त्यामुळे कोल्हापूर ह्या ठिकाणावर सदा सर्वदा महालक्ष्मीचा अशीर्वाद आहे असे मानतात. हे अविमुक्त क्षेत्र अगदी महाप्रलयकाळातसूद्धा सुरक्षित राहणार अशी धारणा. प्राचीन ग्रंथ “देवी गीता’ मध्येसुद्धा कोल्हापूरचा उल्लेख कोल्लापूर या नावाने एक महत्वाचे शक्तीपीठ म्हणून केला आहे. “देवी भागवत” पुराणामध्ये भक्तांसाठी देवी लक्ष्मीने सदोदित या नगरीत राहण्याची इच्छा व्यक्त केली असे सांगितले आहे. केदारविजय, विष्णू पुराण, देवीमाहात्म या पुरातन ग्रंथात महालक्ष्मीचा उल्लेख आहे.

2. पश्चिममुखी महालक्ष्मी :

महालक्ष्मीची सुमारे 40 किलोंची तीन फुटाची मूर्ती जेमस्टोन पासून बनवलेली आहे. मूर्तीला चार हात असून उजवीकडील खालच्या हातात म्हाळुंग नावाचे फळ आहे. वरील उजव्या हातात कौमोदक (गदा), डाव्या वरील हातात खेटक (ढाल) व खालील हातात पानपात्र आहे. जगातील देवाच्या बहुतांशी मूर्ती पूर्वेकडे मुख करून असताना ही महालक्ष्मी पश्चिममुखी आहे हे वैशिष्ठ. हिंदू पौराणिक कथांनुसार कोलासुर नावाच्या भयंकर राक्षसाने कोल्हापूरची स्थापना केली. जेव्हा महालक्ष्मीने त्याला ठार मारले तेव्हा त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याचे नाव या नगरीला देण्यात आले.

3. विष्णूदेवाचा शेषनाग :

मूर्तीच्या मखरामध्ये मध्यभागी विष्णूदेवाचा शेषनाग देवीच्या मस्तकावर फणा काढलेल्या स्वरूपात दिसून येतो. मूर्तीच्या मागील बाजूस महालक्ष्मीचे वाहन सिंहाची प्रतिमा असलेली ही प्राचीन मूर्ती पूज्यनीय. असे मानले जाते की तिरुपती बालाजीचे दर्शन या महालक्ष्मीचे दर्शन केले नाही तर अपुरेच.

4. चालुक्य साम्राज्यातील मंदिर :

सुमारे सातव्या शतकातील चालुक्य साम्राज्यातील ह्या मंदिराचा अनेक राजांनी जीर्णोंधार केला. त्याकाळी मंदिरा भोवती गर्द जंगल होते परंतु पहिल्या शतकात राजा कर्णदेवाने मंदिराभोवतीची झाडे दूर करून मंदिरास उजेडात आणले. चालुक्य, शिलाहार, यादव पासून अगदी पेशव्यापर्यंतच्या राजांनी व अदीशंकराचार्यांनी मंदिर जीर्णोधारात सहभाग घेतला.

5. प्रत्येक खांबाचे वेगळे डिझाईन :

अनेक चौथऱ्यांवर उभे केलेल्या या मंदिरात शेकडो खांब आहेत. परंतु निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येते की प्रत्येक खांब दुसऱ्या कोणत्याही खांबापेक्षा वेगळा आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूंशी वाद झाल्यावर देवी या ठिकाणी रुसून बसली होती. या देवीसाठी तिच्या भक्तांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले असे म्हणतात. अनेक कारागिरांनी एकाचवेळी एकमेकांचे डिझाईन न बघता हे खांब तयार केले म्हणूनच कदाचित प्रत्येक खांबाचे डिझाईन वेगळे असतील असे मानले जाते.

ता. क. : दोस्तहो लेखासोबत प्रसारित केलेली ऐतिहासिक छायाचित्रांचे स्वामित्व मूळ छायाचित्रकाराकडेच. त्यांनी जतन केलेल्या या आठवणीबद्दल त्यांना सलाम.

Advertisement
Popular Post
Advertisement

Need Help?

+919890305454 Monday to Friday 9.00am - 5.00pm
Subscribe to our Newsletter

& Discover the best offers!